नगर -अन्न औषध प्रशासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. विभागाच्या पथकाने शेवगाव येथे तपासणी दरम्यान दूध नमुने तपासणीसाठी घेत दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तब्बल 950 लिटर दूध नष्ट केले आहे. विभागाच्या पथकातील अधिकारी 10 ऑक्टोबर रोजी मे. सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रिज प्रा. लि. शेवगाव एमसीसी शेवगाव येथे तपासणीसाठी गेले होते.
त्यावेळी या प्रकल्पात विक्रीसाठी आलेल्या दूध संकलनाची तपासणी केली असता पाथर्डीतील मे. विवेकानंद दूध संकलन केंद्राचे विक्रीसाठी आणण्यात आलेले 950 लिटर दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून नष्ट केले. या संकलन केंद्राच्या चालकांनी अत्यंत खराब दर्जाच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये दूध संकलित करून त्याची विक्री करत असल्याचे आढळून आले. तसेच या दुधाची मशीनद्वारे तपासणी केली असता त्यात साखरेचे प्रमाण असल्याचे आढळून आले. या दूधाची आम्लता वाढल्याचेही दिसून आले. या दुधाचा नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त पथकाने सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रिज या प्रकल्पाचीही तपासणी केली. या ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेल्या दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. सदरची कारवाई एफडीएचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी केली.
दूध संकलन केंद्रांनी “ही’ काळजी घ्यावी..
दूध संकलन केंद्र चालकांनी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा दूध स्टेनलेस स्टील किंवा ऍल्यूमिनियमच्या कॅनमध्ये संकलित करावे. त्यानंतर तीन तासांच्या आत शितकरण केंद्रात पोहोच होईल याची काळजी घ्यावी. दूध शितकरण केंद्रांनी दूध स्वीकारताना सर्व भेसळकारी पदार्थांच्या चाचण्या घेऊनच दूध स्वीकारावे. संशयास्पद असलेल्या दूध व्यावसायिकांचे दूध घेऊ नये.