वॉशिंग्टन, दि. 11- फायझर-बायोएनटेकची करोना लस 12 वर्षावरील बालकांना देण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासनाकडून अर्थात एफडीकडून मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि करोना विरोधातील लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे. अशा प्रकारची मान्यता देण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात अन्न आणि औषधे प्रशासनासमोर आला होता.
करोनाच्या भविष्यातील लाटेविरोधात लहान मुलांना लस देण्यामुळे संरक्षण मिळेल असा कयास अमेरिकेतील तज्ज्ञांकडून मांडला जात आहे. आता आपल्या मुलांना करोनाची लस द्यावी, असे आवाहनही अमेरिका सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. करोनाची लस अमेरिकेत 12 ते 15 वयोगटातील बालकांना देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलें आहे.
अमेरिकेतील 16 वर्षावरील सर्वांना फायझरची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे. 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास फायझर कंपनीने गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा फायझरच्या वतीने करण्यात आला आहे.