वाघापूर : दिवसा पाळीचा तीन दिवसाआडचा पुरवठा आता दिवसाआड
वाघापूर, दि. 2 (वार्ताहर) – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या गैरकारभाराचा कळस झाला आहे. दरम्यान, दिवस पाळीला वीजपुरवठा आठवड्यातून तीनच दिवस असते आता त्यात अजब गजब फतवा काढून हा दिवसा पाळीचा वीजपुरवठा दिवसाआड केल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. ज्यांच्या पाळीच्या विहिरी आहेत किंवा ज्या शेतकर्यांना एक दिवसाचीच पाळी आहे. या शेतकर्यांनी नेमके करायचे काय असा प्रश्न शेतकर्यांपुढे सध्या पडलेला दिसत आहे.
वास्तविक पाहता सध्या हवामान बदलामुळे बर्याचशा विहिरींचे व कुपनलिकेचे पाणी हे कमी झाले आहे. महावितरणने दिवस पाळीत विजपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने बळीराजाची कोंडी झाली आहे. ज्यांची पाळी एक दिवसाची असेल व त्या विहिरीत समजा सहा जण असतील तर त्या शेतकर्याला सातव्या दिवशी पाळी मिळेल व ज्या दिवशी त्या शेतकर्याची पाळी येईल त्या दिवशी जर वीजच नसेल तर त्या शेतकर्याला 15 दिवस पाण्याशिवाय आपली शेती कशी जपावी हा गहन प्रश्न पडलेला आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराला नेमका कोणाचा धाक असणार हाच प्रश्न सध्या पुरंदर तालुक्यातील शेतकरी विचारीत आहेत.
धोरण वगैरे काही नाही लोड बसत नाही म्हणून केलेली अॅडजस्टमेंट आहे.
– जीवन ठोंबरे, शाखा अभियंता, राजेवाडी
मलाही बर्याच शेतकर्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकर्यांना कोणताही त्रास होणार नाही व या अनुषंगाने मी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी दोनच दिवसात मिटींग लावणार आहे.
– विजय शिवतारे, आमदार, पुरंदर-हवेली