पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुणे सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी फत्तेचंद नगराज रांका यांची आठव्यांदा फेरनिवड झाली आहे. याबरोबरच अभय गाडगीळ यांची उपाध्यक्ष, अमृतलाल मांगिलाल सोळंकी यांची सचिव, राजेंद्र सोमनाथ वाईकर यांची सह सचिव व कुमारपाल घिसुलाल सोळंकी यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली.
सराफ असोसिएशनची सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. असोसिएशन येत्या १ जानेवारीला १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व आहे. सभेच्या सुरुवातीला हॉलमार्किंग, जीएसटी, पी.एम.एल.ए. व एच.यू.आय.डी. या विषयांवर सेमिनार आयोजित केले होते.
त्यामध्ये मुंबईचे तज्ज्ञ सीए भावीन मेहता यांनी मार्गदर्शन केले. नंतर सदस्यांना वेळोवेळी कायद्याची माहिती व्हावी, म्हणून संस्थेतर्फे “सुवर्णपत्र’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. त्याचे संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सुवर्णपत्राचे संपादक शैलेश रांका व सह-संपादक जयंत रणधीर आहेत. यावेळी घोडावत यांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा ओसवाल व पुनम अष्टेकर यांनी केले. संपूर्ण बॅकस्टेजची जबाबदारी ममता बाठिया, दर्शना शाँड, राजेंद्र मेहता, योगेंद्र अष्टेकर व सोनी यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सराफांचा सत्कार
गोविंद उर्फ अजित विश्वनाथ गाडगीळ यांना पुणे सराफ जीवन गौरव पुरस्कार – २०२४ प्रदान करण्यात आला. ५० वर्षे जुनी प्रगतीशील पेढी या विभागात दिलीप सोनिगरा ज्वेलर्स व श्रीपाद शंकर नगरकर सराफ यांना पुरस्कार देण्यात आले.
योगेंद्र डी. अष्टेकर व विशाल गणेश वर्मा यांना प्रगतिशील तरूण सराफ व्यावसायिक पुरस्कार तर शिवेंद्र ज्वेलर्स व मनिष ज्वेलर्स यांना प्रगतीशील होलसेल व्यापारी या श्रेणीतील पुरस्काराने या कार्यक्रमात गौरवण्यात आले.