सूरज पे मंगल भारीमध्ये फातिमा सना शेख चक्क मऱ्हाठमोळ्या रोलमध्ये दिसणार आहे. तिने आपल्या फर्स्टलुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लहानशा मध्यमवर्गीय घरातील किचनमध्ये लाल साडीमध्ये ती दिसते आहे.
यापूर्वी “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये फातिमा दिसली होती. दुर्दैवाने या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मोठा झटका मिळाला होता. पण “दंगल’मध्ये फातिमा जी प्रसिद्धी मिळाली होती, ती अबाधित आहे. “सूरज पे मंगल भारी’मध्ये मराठी टोनमध्ये बोलायचे असल्याने तिने चक्क मराठी शिकवणी लावली होती.
तसेच दिग्दर्शक अभिषेक शर्माच्या बरोबर रिडींग सेशनही केली आहेत. सेटवर जाण्यापूर्वी ती साडीमध्ये वावरण्याची सवयही करत असते. तिने स्वतः साडी नेसण्याचीही सवय करून घेतली आहे.
फातिमाच्या रोलला दुहेरी वलय असणार आहे. एकाचवेळी कमकुवत आणि कठोरपणा तिला दाखवायचा आहे. त्यादृष्टीने फातिमाला हे आव्हान आहे. तिला वेळेचे गणितही पक्के माहित असते.
तिला स्वतःमध्ये बदल कसा करून घ्यायचा हे “दंगल’मधून तिने दाखवून दिले आहे. त्यामुळे “सूरज पे मंगल भारी’मध्ये फातिमाला मऱ्हाटमोळ्या रोलमध्ये बघणे हे तिच्या फॅन्ससाठी आणि मराठी प्रेक्षकांसाठीही नक्की प्रेक्षणीय असणार आहे.