नगर: गावाकडील जमीन नावावर करून देत नसल्याच्या रागातून वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अशोक दत्तू गिते (वय 22, रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, नगर) असे शिक्षा ठोठालेल्याचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला आहे.
अशोक गीते व त्याचे वडील दत्तू हे दोघे नगरमधील निर्मलनगरमध्ये राहत होते. दत्तू यांचा सायकल, मिक्सर, कुकर दुरूस्तीचा व्यवसाय होता. या दोघांमध्ये गावाकडील जमिनीवर वाद होत होते. या दोघांमध्ये घटनेच्या दिवशी असेच वाद झाले. अशोक याने रागाच्या भरात वडील दत्तू यांच्या डोक्यात कुकर मारून जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी अशोक याची आत्या गयाबाई पालवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर खटल्याचा युक्तिवाद झाला. सरकारी वकील ऍड. केदार केसकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.
आरोपी अशोक याच्या वकिलांनी बचावात मनोरुग्ण असल्याचा दावा केला. परंतु सरकार पक्षातर्फे सादर केलेल पुरावे आणि साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. जे. एस. पाठक, तपासी अधिकारी पी. व्ही. पवार, एस. एस. सपकाळे यांनी साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.