चिखलगावातील घटना : मुलावर गुन्हा दाखल
पिरंगुट(प्रतिनिी) – चिखलगाव (ता. मुळशी) येथे मुलाने रागाच्या भरात वडिलांचा खून केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर सदाशिव फाले (वय अंदाजे 55, रा. चिखलगाव, ता. मुळशी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयंत मधुकर फाले (वय 31) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर मृताची पत्नी शैलेजा मधुकर फाले (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे.
पौडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले की, सोमवारी सायंकाळी सात वाजता फाले कुटुंब आपल्या घरात बसले होते. त्यावेळी आरोपी जयंतच्या लहान मुलीस मयत मधुकर यांनी अपशब्द वापरला. याचा राग आल्याने जयंतने वडिलांना मारहाण केली. तसेच तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोके हातात पकडून घरातील हॉलच्या भिंतीवर जोरात आपटल्याने मधुकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.