वॉशिंग्टन – अमेरिकेत पैशांच्या लोभापाई वडिलांनीच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी वडिलांनी आपल्या कुटुंबाचा अपघात विमा काढला. काही काळ या विम्याचे हप्ते भरल्यानंतर त्याने विम्यावर दावा करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलांच्याच अपघाताचा कट रचला. यानुसार त्याने कुटुंबाला सहलीला जायचे असे सांगून कारचा नदीच्या जवळ ठरवून अपघात केला. यात तो स्वतः वाचला, मात्र त्यात त्याच्या 8 आणि 13 वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने तब्बल 212 वर्षांची शिक्षा सुनावली.
मुलांची हत्या करणाऱ्या 45 वर्षीय आरोपीचे नाव अली एलमेजयेन आहे. तो इजिप्तचा नागरिक आहे. त्याने आपल्या दोन मुलांच्या नावावर अपघात विमा काढला होता. त्याचा डोळा या विम्याच्या रकमेवर होता. विम्याची ही मोठी रक्कम आपल्याला मिळावी यासाठी त्याने आपल्याच मुलांच्या अपघाताचा कट रचला. आरोपीने 9 एप्रिल 2015 रोजी आपल्या दोन मुलांना आणि पत्नीला लॉस एंजेलिसला फिरायला जायचे आहे असे सांगून गाडीत बसवले. त्यानंतर त्याने मध्येच रस्त्यात गाडीचा अपघात घडवला आणि गाडी नदीत पाडली. अपघातानंतर त्याने मुलांना कोणतीही मदत न करता गाडीतून आपला जीव वाचवला आणि मुलांना मरण्यासाठी गाडीतच सोडून दिलं.
दोन मुले आणि पत्नी यात मरेल असे नियोजन आरोपीने केले होते. पण त्याच्या पत्नीला बुडताना पाहून मच्छिमारांना तिला वाचवण्यात यश आले. मात्र, मुले पोहू न शकल्याने पाण्यात बुडाले. यानंतर आरोपी या मुलांच्या नावावरील अपघात विम्याची 20 कोटी रुपयांची रक्कम घेणार त्याआधीच पोलिसांनी हा कट उघड केला. आरोपी या विम्यापोटी दरवर्षी 6 हजार डॉलर म्हणजे जवळपास 4.2 लाख रुपये भरत होता.