संगमनेर: मुलाच्या नावावर असलेली जमीन आणि घरातील गोधन विकण्याच्या वादातून बापाने पोटच्या पोराचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात सोमवारी (दि.10) घडली. अंकुश दत्तात्रय हुलवळे (वय 28) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून आरोपी बाप दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (वय 51) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, दत्तात्रय हुलवळे हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या दोन मुलांच्या नावावर असलेली जमीन विकण्यासाठी मुलांवर दबाव टाकत होता. सोमवारी दुपारी दत्तात्रय घरातील गाई आणि धान्य विकण्यासाठी घेऊन जात असताना मुलगा अंकुश याने त्याचा विरोध केला. याचा राग येऊन दत्तात्रय हुलवळे याने नायलॉनच्या दोरीने अंकुशचा गळा आवळून त्याचा खून केला.
या घटनेप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु मयत अंकुश हुलवळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होवून अंत्यसंस्कार झाल्यानंतर मयताचा भाऊ प्रविण दत्तात्रय हुलवळे यांनी वडिलांनी भावाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची फिर्याद मंगळवारी (11 जून ) रात्री उशिरा पोलिसांत दिली. सदर फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी वडील दत्तात्रय रामचंद्र हुलवळे याच्याविरुद्ध मुलाच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी ताबडतोब आरोपी दत्तात्रय हुलवळे याला अटक केली. त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.