पटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थाना बाहेर रविवारी दुपारपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. लालुंची सून ऐश्वर्या ही सासरच्या छळाला कंटाळून त्यांच्याच घरासमोर धरणे देवून बसल्या होत्या. दरम्यान, ऐश्वर्या यांना अखेर सोमवारी सकाळी घरात प्रवेश मिळाला. तत्पूर्वी ऐश्वर्या यांनी आपल्या सासू राबडीदेवी आणि नणंद मिसा भारती यांच्यावर छळ करणे आणि घरातून बाहेर काढण्याचा आरोप केला. तसेच राबडीदेवी यांनीही ऐश्वर्या यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे.
लालप्रसाद यादव यांचे कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत सुनेशी समझोता करण्याच्या प्रयत्नात होते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार अखेर सकाळी ऐश्वर्या यांचा घरात प्रवेश झाला. ऐश्वर्या यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करु नये यावरुन सहमती झाल्याचे सांगण्यात येते. ऐश्वर्या यांचे वडील चंद्रिका राय हेही लालूंच्या घराबाहेर रात्रभर एका खुर्चीवर बसून होते. यावेळी बाचाबाचीही झाली पण ते खुर्चीवरुन उठले नाहीत. मोठ्या अपेक्षेने मुलीचे लग्न लालूंच्या मुलाशी केले होते. मला जराही याची कल्पना असती तर चुकूनही या कुटुंबात मुलीचे लग्न केले नसते, असे हताशपूर्ण वक्तव्य चंद्रिका राय यांनी केले.