गोरखपूर – उत्तर प्रदेशमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेबाबत सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. सासरे कैलाश यादव यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना चार मुले असून पूजाचा नवरा तिसरा मुलगा होता, त्याचाही मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले आहे आणि पूजा तिच्या नवीन नात्यामुळे खूश आहे. कैलाश यादव हे बरहलगंज कोतवाली भागातील छपिया उमराव गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिक वृत्तानुसार, बरहलगंजचे कैलाश यादव यांनी त्यांची सून पूजासह सात फेरे घेतेले आहेत. यावेळी लग्नासाठी गावकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या विवाहाबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पतीच्या निधनानंतर पूजा एकाकी पडली होती. तिचे दुसऱ्या एका मुलाशी लग्न लावून देण्यात आले होते, पण तिला तिचे तेथिल लोकांशी पटत नव्हते त्यामुळे ती पुन्हा तिच्या पहिल्या पतीच्या घरी आली. त्यानंतर तिने तिच्या स्वखुशीने सासऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. समाजाची पर्वा न करता तिने हे लग्न केले.
प्रकरण पोहोचले पोलिसांपर्यंत
दरम्यान, या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र याबाबत कोणाचीही तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी परस्पर संमतीने हे लग्न केले आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. कोणाच्याही दबावाखाली न येता स्वखुशीने हे लग्न केल्याचे महिलेने सांगितले आहे.