यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद (इजारा) येथे एक हृदयद्रावक घटना घडली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2024 च्या परीक्षेत मोहिनी प्रल्हाद खंदारे हिने 884 वी रँक मिळवत प्रशासकीय अधिकारी होण्याचा मान मिळवला. मात्र, या यशाचा आनंद साजरा करताना तिचे वडील प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने खंदारे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समिती, बुलढाणा येथील निवृत्त विस्तार अधिकारी होते. मुलीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते गावकऱ्यांना पेढे वाटत होते. याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. एकीकडे मोहिनीच्या यशाने कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर दुसरीकडे प्रल्हाद यांच्या अकस्मात निधनाने सर्वांवर शोककळा पसरली.
मोहिनीने पुण्यातील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत हे यश मिळवले. यापूर्वी तिने 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतही यश संपादन केले होते. तिच्या या यशाने यवतमाळसह संपूर्ण विदर्भाचे नाव उंचावले आहे. परंतु, वडिलांच्या निधनामुळे तिच्या यशाचा आनंद कायमचा अपूर्ण राहिला आहे. या घटनेने गावात शोकाकूल वातावरण आहे. मोहिनीच्या यशाबद्दल अभिमान असला, तरी प्रल्हाद खंदारे यांच्या निधनाने कुटुंब आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.