आंध्र प्रदेशात रंगणार बापलेकीचा मुकाबला !

ज्येष्ठ नेते देव यांच्यापुढे कन्येचे आव्हान

अमरावती: आंध्र प्रदेशच्या अराकू लोकसभा मतदारसंघात सत्तारूढ तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ज्येष्ठ नेते व्ही. किशोरचंद्र देव यांना रिंगणात उतरवले आहे. त्या मतदारसंघात कॉंग्रेसने देव यांच्या कन्या व्ही.श्रुतीदेवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील बापलेकीचा मुकाबला संपूर्ण आंध्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

तब्बल सहा वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या देव यांनी अलीकडेच कॉंग्रेसबरोबरचे चार दशकांचे संबंध तोडले. त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत टीडीपीमध्ये प्रवेश केला. टीडीपीनेही त्यांची लगेचच उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर कॉंग्रेसने श्रुती यांनी उमेदवारी देत अराकूमधील लढतीला रंगतदार स्वरूप दिले. पेशाने वकील असणाऱ्या श्रुती यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माझे कार्य पाहून कॉंग्रेसने मला उमेदवारी दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. वडिलांसमवेत अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये कार्य केल्याचे नमूद करत त्यांनी विजयाबद्दल विश्‍वास व्यक्त केला. आता बापलेकीपैकी कोण बाजी मारणार ते निकालातून स्पष्ट होईलच.

Leave A Reply

Your email address will not be published.