जळगावमध्ये वडील-भावाची निर्घृण हत्या

जळगाव – क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या पिता आणि लहान भावाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जळगावातील पहूरपासून जवळच असलेल्या नांद्रा गावात घडला. यामुळे नांद्रा गावासह जिल्हयात खळबळ उडाली आहे.

नांद्रा गावात निलेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो रोजंदारीवर काम करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे तो आपल्या गावी अडकला होता. तर त्याचा लहान भाऊ महेंद्र हा जळगावच्या चटई बनवण्याच्या कंपनीत कामाला होता. मात्र तोही पत्नीसह गेल्या 6 महिन्यांपासून कुसुंबा येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी निलेशचे शेजारांशी भांडण झाले. यावेळी त्याचे वडील आनंद पाटील आणि लहान भाऊ महेंद्र यांनी निलेशला शेजाऱ्यांशी का भांडतोस, असा जाब विचारला. तसेच त्याला वडीलांनी आणि भावाने थोडी मारहाण केली. त्यानंतर शेजाऱ्यांसोबत भांडण मिटवत घरी आणले.

मात्र वडीलांनी आणि भावाने मारहाण केलेल्याचा राग निलेशच्या डोक्‍यात होता. या रागात आई-वडील बाहेर झोपले असताना निलेशने घरातील चाकूने जन्मदात्या पित्यावर वार केले. वडिलांचा आक्रोश ऐकून बाहेर लहान भाऊ महेंद्र आणि त्याची पत्नी अश्विनी धावत आले. त्याचवेळी निलेशने महेंद्रवरही चाकूने वार करत निर्घृण हत्या केली.

या घटनेनंतर महेंद्र यांची पत्नी अश्विनी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आरोपी निलेश आनंद पाटील याला अटक केली आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.