हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर शेळ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात ट्रकमधील ८५ शेळ्या दगावल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात चालक व क्लीनरला दुखापत झाली नाही.
विदर्भातील मलकापूर भागातून एका ट्रकमध्ये (यूपी ७७- एएन ६९७१) शेळ्या भरून हैदराबादकडे नेल्या जात होत्या. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात ट्रक आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.
यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रकमधील ८५ शेळ्या खाली पडल्या व ट्रक त्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे शेळ्या जागेवरच गतप्राण झाल्या. या अपघातात जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सुदैवाने या अपघातात ट्रक चालक व क्लीनरला गंभीर जखम झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.