-सातजण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
-मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना घडली दुर्घटना
-अपघातातील सर्व तरुण होते दारुच्या नशेत
महाबळेश्वर – महाबळेश्वरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महाडनाका परिसरात भरधाव वेगात असलेल्या बोलेरो कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सातजण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, बेलोरोचा चालक हा दारुच्या नशेत तर्रर्र असल्यानेच हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील जखमींना तेथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचार करुन अधिक उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद लक्ष्मण मारुती डावखर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली.
अधिक माहिती अशी, योगेश शिवाजी मोरे (रा. जामखेढ, नगर) याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लक्ष्मण डावखर, सुनील सीताराम डावखर (राधावडी वस्ती, सद्गुरूनगर, भोसरी), महेश विजयकुमार मठपती (रा. तोंडर, ता. उदगीर जि. लातूर सध्या रा. कोंडवे), बाळासो सुदाम मुंडे (रा. वारजे), तानाजी शिवाजी गाडे (रा. मु. पो. जामखेड), प्रकाश काळुराम कांबळे (रा. रुळे, ता. वेल्हा, जि. पुणे) हे सातजण बोलेरे गाडीतून महाबळेश्वर येथे आले होते.
महाबळेश्वरला जाण्यापूर्वी वाईच्या अलिकडेच या सर्वांनी मद्यपान केले. वाहनचालक प्रकाश कांबळे यांनीही मद्यसेवन केले. त्यानंतर हे सर्वजण महाबळेश्वरच्या पुढे घाटात असणाऱ्या एका हॉटेलवर निघाले होते. यावेळी घाटरस्त्यात दारुच्या नशेत असलेल्या चालक प्रकाश कांबळे याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनातील सर्वजण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचार करुन अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालक प्रकाश काळुराम कांबळे याच्यावर भरधाव वेगात, दारूच्या नशेत निष्काळजीपणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बालाजी गायकवाड, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे करीत आहेत.