रायगड : रायगडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि सेलेरो कार यांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि अपघातानंतर एसटी बस रस्त्याच्या उजव्या बाजुला पलटी झाली. या बसमध्ये एनसीसीचे 48 विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाली खोपोली मार्गावर दापोडे गावाजवळ हा अपघात झाला आहे.
कसा झाला अपघात?
पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे हद्दीमध्ये एसटी बस व सेलेरो कारचा भीषण अपघात झाला. एसटी बसचा रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत समोर आले आहे. ही अपघातग्रस्त एसटी बस कर्जत खोपोली मार्गे माणगावकडे जात होती, तर सेलेरो पालीकडून खोपोलीच्या दिशेने येत होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की एसटी बस विद्यार्थ्यांसहीत पलटी झाली. एसटीच्या मागील काच फोडून 48 विद्यार्थ्यांना बसच्याबाहेर काढण्यात आले. या अपघातात सेलेरो कारमधील डॉ. आयुष गायकवाड व विशाल पाटील जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.