Jaypur Accident News : राजस्थानच्या जयपूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बस आणि इको कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
ही घटना आज (दि. ०६) जयपूरमधील दुडू परिसरात घडली आहे. जयपूरहून अजमेरला जाणाऱ्या बसचा टायर फुटून नियंत्रण बिघडल्याने हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील आठ जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक भिलवाडा येथील रहिवासी असून ते भिलवाडाहून जयपूरला येत होते. अचानक बसचा टायर फुटला आणि बसचे नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजक तोडून काही वेळातच दुसऱ्या बाजूला गेली. दरम्यान, समोरून येणाऱ्या एका इको कारने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर गाडीचे मोठे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी व्यक्तींना ताबडतोब बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच क्रेनच्या मदतीने बस रस्त्यावरून हटवण्यात आली आहे. सर्व जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, गुरुवारी पहाटे भिलवाडा येथील कोटडी येथून एका इको कारमधून १४ जण प्रयागराजला निघाले होते. शुक्रवारी त्याला महाकुंभ स्नान करायचे होते. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.