येल्लापुरा/रायचूर (कर्नाटक) – उत्तर कन्नड आणि रायचूर जिल्ह्यात दोन भीषण अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला असून यात तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच अनेक जण जखमी झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक भाजीपाल्याने भरलेली ट्रक पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत ट्रकमधील १० जण ठार झाले असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुस-या दुर्घटनेत ३ विद्यार्थ्यांसमवेत ४ जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली.
कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार हम्पीच्या तिर्थयात्रेसाठी निघालेली होती. मात्र, भीषण दुर्घटनेत कारमधील ४ जणांचा मृत्यू झाला.
कन्नड जिल्ह्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग ६३ वर बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून २९ जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात समोरून येणा-या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात ५० मीटर खोल दरीत कोसळली.
यात लॉरीतून प्रवास करणा-या १० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील इतर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिका व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, अपघाताच्या दोन्ही घटनांवर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना ३ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.