नीरा – येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न झाल्याने पालक आक्रमक झाले आहेत. तातडीने दुरुस्ती न केल्यास 11 जूनपासून उपोषणाला बसण्याचा इशारा पालक व व्यवस्थापन कमिटीने दिला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालकमंत्री, तालुक्याचे आमदारांना देण्यात आले आहे.
शाळेची इमारत मोडकळीस आल्याने येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 550 ते 600 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी गेल्या वर्षी दिला होता. त्यानंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर पालकांनी आंदोलनही केले होते.
यावेळी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी तसेच गटविकासाधिकारी यांनी पुढील सत्रापासून तात्पुरत्या शेडमध्ये स्वतंत्रपणे व पूर्णवेळ शाळा भरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक आचारसंहिततेमुळे पालकांना 23 मे पर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले होते. तर आचारसंहिता संपल्यानंतर पालकांनी याबाबत विचारणा केली असता शाळा बांधण्यासाठीचा लागणारा प्रकल्प अहवाल तयार झाला असून त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी आवश्यक असल्याने तो सप्टेंबरमध्ये मंजूर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता सभा होईपर्यंत विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे हा प्रश्न पालक व प्रशासनापुढे पडला आहे.
तात्पुरत्या शेडसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. या आठवड्यात होणाऱ्या मिटिंगमध्ये मंजुरी मिळेल. त्यानंतर रयत संकुलात शेडचे कामकाज सुरू होईल. मध्यंतरी आचारसंहिता व मार्च अखेरच्या कामांमुळे थोडा उशीर झाला. तरी पालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
-राजे लोंढे, गटशिक्षणाधिकारी