कोरेगाव भीमामधील कंपनीविरोधात उपोषण

प्रदूषण थांबविण्याचे आदेश बासनात गुंडाळले : कंपनी व्यवस्थापनाकडून आरोप फेटाळले

शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील इंटरनिस फाईन केमिकल लिमिटेड कंपनीमधील प्रदूषणाबाबत काही युवकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे कार्यालयसमोर आंदोलन केल्यानंतर ही कंपनी बंद करण्याबाबतचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. 16 नोव्हेंबर रोजी दिलेले होते. तरी देखील कंपनी सुरूच असल्यामुळे ही कंपनी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी अखेर युवकांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

कोरेगाव भीमा येथे इंटरनिस कंपनी नदीच्या कडेला आहे. कंपनीतील केमिकल व हवामानामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. जलस्त्रोत व जमिनी नापीक झालेल्या आहेत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने पुणे येथील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यांनतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी यांनी ही कंपनी बंदचे आदेश दिलेले होते.

परंतु या आदेशाला न जुमानता देखील कंपनीने सर्व काही कामे व उत्पादने सुरूच ठेवलेली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या न्याय हक्‍कासाठी अखेर कौस्तुभ दशरथ होळकर यांसह आदी युवकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाला मनसेचे अध्यक्ष कैलास नरके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिरूर हवेली अध्यक्ष दादासाहेब भोंडवे, युवा सेनेचे उप सेनाप्रमुख वैभव ढोकले यांनी पाठींबा दिला आहे.

आमच्या कंपनीचे कसलेही प्रदूषण नाही -गरुड
आमच्या कंपनीचे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही. आमच्या कंपनीच्या प्रदुषणाबाबत सर्व काही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून क्‍लियर झालेले आहे, असे सांगत उपोषणाला बसलेले युवकाचे वडील वीस वर्षे आमच्या कंपनीत नोकरीला होते. तेव्हा त्यांना कधीच प्रदूषण दिसले नाही. आताच कसे प्रदूषण दिसले, असा देखील सवाल कंपनीचे एच. आर. अरविंद गरुड यांनी केला.

कोरेगाव भीमा येथील कंपनीला पूर्वी बंद करण्याचे आदेश दिलेले होते, परंतु या कंपनीने त्यामध्ये सुधारणा केली आहे. उच्च आदेशानुसार कंपनीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे. कंपनीचा प्रदूषणाचा मोठा असा विषय नाही.
– जगदीश साळुंके, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.