लंडन : इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेचा 13 वा सामना नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि लंडन स्पिरिट यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या अॅडम रॉसिंग्टनने सर्वांचे लक्ष वेधत, द हंड्रेडच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.
१०० चेंडूंच्या या सामन्यात लंडन स्पिरिटसाठी अॅडम रॉसिंग्टनने केवळ १५ चेंडूत १५ धावा केल्या. त्याचा ६६ धावांच्या खेळीत रॉसिंग्टनने २५ चेंडूत ७ षटकारही मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २६४ होता. रॉसिंग्टनच्या स्फोटक खेळीमुळेच लंडन संघाने नॉर्दर्न सुपरचार्जरचा ७ फलंदाज राखून पराभव केला.
१०० चेंडूंच्या या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर नॉर्दर्न सुपरचार्जर संघाने ५ गडी गमावून १४३ धावा केल्या. यादरम्यान डु प्लेसिसने ३५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. डू प्लेसिसशिवाय अॅडम हॉसने १४ चेंडूत ३० धावा केल्या.
नॉर्दर्नने दिलेल्या १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन स्पिरीटचा संघाकडून, रॉसिंग्टन आणि डॅनियल बेल-ड्रमंड फलंदाजीसाठी मैदानात उतरले. डॅनियल अवघ्या १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला असला, तरी रॉसिंग्टनने गोलंदाजांची दाणादाण सुरूच ठेवली. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने २५ चेंडूत ४३ धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकारही लगावला. याशिवाय डॅनियल लॉरेन्सने १६ चेंडूत १८ धावांची खेळी केली.
रॉसिंग्टन आणि मॅक्सवेल यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर लंडनच्या संघाने ६६ चेंडू बाकी असताना केवळ तीन विकेट्स गमावून दणदणीत विजय नोंदवला.