टोलनाक्‍यांवर 1 डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य

फास्टॅग नसेल तर भरावा लागेला दुप्पट टोल
कराड – कॅशलेस इलेक्‍ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी वाहनांना 1 डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवरील टोलनाक्‍यांवर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे. कराड येथे तासवडे टोलनाक्‍यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे बाळासाहेब साळुंखे, टोल प्लाझाचे रमेश शर्मा यांनी आज वाहनधारकांना याबाबत माहिती दिली.

नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन प्रोग्रॅम अंतर्गत केंद्र शासनाने 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या मोटार वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे. ज्या वाहनांवर फास्टॅग राहणार नाही, त्या वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात फास्टॅग लागू करण्याबाबत घोषणा केली होती.

फास्टॅगचा वापर करण्याचे आवाहन
फास्टॅगमुळे वाहनधारकांची वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. पर्यायाने पैशांचीही बचत होणार. शिवाय टोलनाक्‍यांवरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. सर्व वाहनधारकांना फास्टॅग अनिवार्य असून टोल व्यवस्थापनाच्यावतीने टोलनाक्‍यावर फास्टॅग ऍक्‍टिव्हेट करण्याची सोय करण्यात आली आहे. दि. 1 डिसेंबरपासून फास्टॅगचा वापर करावा, असे आवाहन तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी केले आहे.

कागदपत्रांची आवश्‍यकता
फास्टॅगसाठी वाहनाचे आरसी पुस्तक, वाहनमालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे आणि घराचा पत्ता असलेला एक पुरावा आवश्‍यक आहे.

कशा प्रकारे करता येईल रिचार्ज?
कोणत्याही वाहनचालकाला आपले फास्टॅग अकाऊंट क्रेडिट, डेबिट कार्ड आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून रिचार्ज करता येईल. फास्टॅग खाते कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेने रिचार्ज करता येऊ शकते. आयसीआयसीआय, एसबीआय, एचडीएफसी, ऍक्‍सिस, पंजाब नॅशनल, आयएचएमसीएल (इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी), पेटीएम आदींच्या माध्यमातून फास्टॅग अकाऊंट काढता येते.

फास्टॅगचे फायदे
फास्टॅगमुळे वाहनचालकांची वेळ, इंधन व पैशांची बचत होणार आहे. टोलनाक्‍यांवर वाहतूक कोंडी होणार नाही. वाहनांमधील प्रवाशांची माहिती मिळाल्याने गुन्हे आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मदत मिळेल.

काय आहे फास्टॅग?
फास्टॅग सिस्टीमच्या माध्यमातून वाहनांना टोलनाक्‍यांवर न थांबता टोल भरता येतो. यासाठी वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्‍यक आहे. हा अधिकृत फास्टॅग बॅंकांकडून खरेदी करता येईल.
असे करते काम
टोलनाक्‍यांवर ऑटोमॅटिक ट्रान्जॅक्‍शनसाठी वाहनाच्या विंड स्क्रीनवर फास्टॅग लावता येतो. यामध्ये रेडिओ फ्रिक्‍वेन्सी आयडेंटीफिकेशन असते. वाहन टोलनाक्‍याजवळ जाताच तेथे लावलेल्या सेन्सरमुळे टॅग स्कॅन होतो. त्यानंतर फास्टॅग अकाऊंटमधून शुल्क कापले जाते. खात्यातील रक्‍कम संपल्यानंतर रिचार्ज करावा लागतो. फास्टॅगची वैधता पाच वर्षांची असते. पाच वर्षांनंतर वाहनचालकांना फास्टॅग बदलावा लागतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)