फास्टॅगची घोषणा पण जिल्ह्यातील यंत्रणा अनभिज्ञ

सातारा – टोल आकारणीसाठी 1 डिसेंबरपासून वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, आनेवाडी व तासवडे येथील टोल नाक्‍यांवर अजूनही फास्टॅगच्या चिप उपलब्ध नाहीत. फास्टॅग नसलेल्या वाहनांना नियमानुसार टोलच्या दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. मात्र, ही यंत्रणा नसलेल्या ठिकाणी वाहनधारकांना दुप्पट आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्यास त्याला जवाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

रस्ते महामार्ग प्राधिकरण गेला महिनाभर फास्टॅग सुविधेबाबत प्रबोधन करत आहे. मात्र, फास्टॅगची इलेक्‍ट्रॉनिक चिप कोठे व कशी उपलब्ध होणार याची माहिती उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात वाहनचालकांबरोबर शासकीय यंत्रणाही संभ्रमात आहे. फास्टॅगच्या दरपत्रकातही स्पष्टता नसल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. टोल नाके, नोंदणीकृत बॅंका, आरटीओ कार्यालये, महामार्गांवरील फूड प्लाझा इत्यादी ठिकाणी दोनशे ते पाचशे रुपये अनामत रकमेत फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, त्यातही वाढीव शुल्काचा बाजार सुरू झाल्याने वाहनचालकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

1 डिसेंबरपासून फास्टॅग वाहनांना अनिवार्य आहे अन्यथा दुप्पट दंड करण्याची तंबी सरकारने दिली आहे; परंतु जिल्ह्यात अजूनही फास्टॅग उपलब्ध नसल्याची माहिती आहे. ही सुविधा येत्या दोन दिवसांत उपलब्ध करण्याची हमी महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिला. फास्टॅगसाठी बॅंक खात्यावर किमान 150 रुपये प्रत्येक वेळी शिल्लक असणे अनिवार्य आहे. फास्टॅग असलेल्या वाहनांसाठी टोल नाक्‍यांवर स्वतंत्र लेन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फास्टॅग म्हणजे काय ?
सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर मोबाईलला जसे ीळा लरीव आहे आणि जेवढा तुम्ही रिचार्ज करणार तेवढा वेळ तुम्ही बोलू शकता. तसेच फास्टॅग ही चिप असून ती वाहनाच्या पुढच्या बाजूच्या काचेच्या आतील बाजूस लावतात. त्यावर केलेल्या रिचार्ज रकमेचा वापर करून तुम्ही टोल नाक्‍यावरून जाऊ शकता. त्यासाठी रांगेत थांबण्याची किंवा रोख पैसे देण्याची आवश्‍यकता नाही.

फास्टॅग असेल तर थांबू नका
फास्टॅग असलेल्या वाहनांसाठी टोल नाक्‍यांवर सेपरेट लेन्स असून त्या लेन्समध्ये रोखीने टोल भरणाऱ्या गाड्या न्यायला परवानगी नाही. त्यामुळे फास्टॅग असलेली वाहने टोल बूथवर न थांबता जातील. तेथे लावलेल्या सेन्सरने फास्टॅग स्कॅन होऊन वाहनधारकाच्या खात्यातून आपोआप पैसे वजा होतील.

टोल वसुली कशी कळणार?
वाहन टोल नाक्‍यावरून गेल्यावर 15 मिनिटांमध्ये वाहनधारकाच्या मोबाइलवर बॅंकेकडून मेसेज येईल आणि ईमेल येईल. फास्टॅगचे वेगळे अकाउंट तयार केले जाईल. त्यामधून फक्त टोल साठीच रक्‍कम काढली जाईल. या खात्यातील व्यवहारांची माहितीही मिळू शकेल.

परतावा शुल्काची सोय
फास्टॅग वापरणाऱ्यांना सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची वाहने 24 तासांच्या आत त्याच टोल नाक्‍यावरून परत गेल्यास त्यांना रिटर्न चार्जेस म्हणून 50 टक्‍के टोल आकारणी होईल. उदा. जाताना 100 रुपये टोल लागला असेल तर येताना फक्त 50 रुपये आकारणी होईल.

वैधता
फास्टॅग नोंदणी झाल्यापासून पुढील पाच वर्षांकरिता वैध राहील. त्यानंतर त्याचे नूतनीकरण करता येईल किंवा अकाऊंट बंद केल्यावर त्या खात्यावरील शिल्लक रक्‍कम आणि अनामत रकमेचा चेक बॅंकेमार्फत घरपोच होईल. कारसाठी 700 रुपये चार्जेस आहेत ( 200 रुपये अनामत, 200 रुपयांचा रिचार्ज, 100 रुपये कार्डाची किंमत, 200 रु ऍक्‍टिव्हेशन चार्जेस)

Leave A Reply

Your email address will not be published.