“साईकृपा’ विरोधात आमरण उपोषण

श्रीगोंदा – “साईकृपा’ कारखान्याकडील शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांची थकीत देणी तत्काळ देण्यात यावीत, या मागणीसाठी “बीआरएस’चे तालुका समन्वयक टिळक भोस आणि तत्कालीन कर्मचारी विशाल सकट यांनी सहकाऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर साईकृपा (हिरडगाव) साखर कारखान्याविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत बोलताना विशाल सकट म्हणाले की,विक्रमसिंह पाचपुते व भागीदारांच्या यांच्या मालकीच्या हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांची देणी थकलेली आहेत. मात्र कारखान्याने सर्व देणी दिलेली असल्याची खोटी माहिती सादर करून कारखाना विक्रीचा घाट घालण्यात आला आहे. कारखान्याने थकीत पैसे तत्काळ द्यावेत, अन्यथा कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आहे.
त्याचबरोबर सर्व देणी दिल्याशिवाय कारखान्याला गाळप परवाना देखील देऊ नये. टिळक भोस म्हणाले, आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणी झालेल्या साईकृपा साखर कारखान्याने सामान्य जनतेची कोट्यवधी रुपयांची देणी थकवून त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सर्व देणी दिल्याशिवाय आम्ही कारखाना चालवू देणार नाहीत. यावेळी “बीएसएस’चे घनश्याम शेलार, शरद पवार, युवराज पळसकर, युवराज उबाळे आदी उपस्थित होते.





