पुणेकरांना मिळणार जलद अग्निसुरक्षा

शहरासह उपनगरांत सुरू होणार आणखी दहा अग्निशमन केंद्रे

पुणे – शहर आणि उपनगरांचा वाढता विस्तार लक्षात घेता सध्याच्या अग्निशमन दलावर जास्तीचा ताण येत आहे. त्यामुळे दलाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आणखी दहा केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. या प्रस्तावित जागा ताब्यात मिळाल्या असून त्याठिकाणी बांधकामही सुरू झाले आहे. हे सर्व काम येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

शहर आणि उपनगरांत नागरीकरण वाढत असतानाच कारखानदारी आणि व्यवसायातही वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणावर ताण येत आहे. असे असतानाच राज्य शासनाने महापालिका हद्दीमध्ये नव्याने गावे समाविष्ट केली आहेत. परिणामी हा ताण अधिकच वाढत आहे. त्यातच शहर आणि उपनगरांच्या भागात अग्निशमन दलाची अवघी 14 केंद्रे आहेत. त्यातही उपनगरांमध्ये या केंद्राचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अथवा अन्य आपत्तीच्या घटना घडल्यास तेथे पोहोचण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळेच उपनगर आणि शहराच्या काही भागांमध्ये आणखी दहा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून हे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती अग्निशमन दल प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.

खराडी, धानोरी, महमंदवाडी, काळेपडळ, बावधन, वारजे, धायरी, नाना पेठ, मुंढवा आणि चांदणी चौक याठिकाणी नव्याने केंद्रे सुरू होणार आहेत, अशी माहिती दिली.

दिवाळीपर्यंत केंद्रे सुरू होणार
ही केंद्रे सुरू करण्यासाठी प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यानुसार या केंद्रांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्याबाबत सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर येत्या दिवाळीपर्यंत ही केंद्रे प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात आणखी पाच केंद्रांचा प्रस्ताव प्रशासनाला देण्यात येणार आहे. ही केंद्रेही लवकरात लवकर सुरू करण्यास प्रशासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही रणपिसे यांनी स्पष्ट केले.

उपनगरांचा ताण होणार कमी
महापालिका हद्दीमध्ये नव्याने गावांचा समावेश झाला असला तरी याठिकाणी अग्निशमन दलाची केंद्रे नव्हती. त्यामुळे उपनगरांमध्ये आगीच्या अथवा अन्य आपत्तीच्या घटना घडल्यास शहरातील केंद्रामधून यंत्रणा पाठवावी लागत होती. आपत्तीच्या ठिकाणी या गाड्या जाण्यासाठी वेळ लागत असल्याने या घटनेचे गांभीर्य आणखीनच वाढत होते. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या चारही बाजूंना अग्निशमन दलाची केंद्रे सुरू करण्यात यावी, असा प्रस्ताव प्रशासनाला देण्यात आला होता. आता ही मागणी मान्य झाल्याने त्या त्या भागातील घटनास्थळी तत्काळ पोहोचणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे उपनगरांतील ताण बहुतांशी प्रमाणात कमी होणार आहे, असेही रणपिसे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.