मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांना भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव मुकणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी दुखापतीमुळे उमेशला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्याच्या दुखापतीची तपासणी केल्यानंतर संघाच्या फिजीओंनी याबबातचा अहवाल दिला असून त्याला पुढील 3 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
त्यामुळे तो उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 8 वे षटक टाकत असताना उमेशच्या पायाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले होते.
दरम्यान, भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून उर्वरीत दोन लढती अद्याप बाकी आहेत. तिसरी लढत 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सिडनीत होणार आहे. त्यानंतर चौथी आणि अखेरची कसोटी 15 ते 19 जानेवारी दरम्यान ब्रिसबेन येथे होईल.