मॅंचेस्टर- करोनाचा धोका कमी झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका इंग्लंडने जिंकली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकल्यानंतर पुढील दोन सामने इंग्लंडने जिंकले. या मालिकेत गोलंदाजीसह फलंदाजीतही गुणवत्ता सिद्ध केलेल्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचा चांदीचे स्टम्प देऊन इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने गौरव केला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची वाताहत करताना ब्रॉडने कसोटीत 500 बळींचा आकडा पार केला. ब्रॉडने गेल्या वर्षीच्या मालिकांमध्येही कमालीचे सातत्य दाखवले होते. कसोटीत पाचशे बळी घेत त्याने अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा केवळ दुसराच गोलंदाज बनण्याचा पराक्रम केला. तर जागतिक स्तारावरचा सातवा गोलंदाज ठरला. यापूर्वी पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करणारे गोलंदाज आजही नावाजले जातात, तसा ब्रॉड देखील नावाजला जाईल, असा विश्वास इंग्लंड मंडळाने व्यक्त केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी टिपणारा ब्रॉड सातवा गोलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा, भारताचा अनिल कुंबळे, इंग्लंडचा जेम्स अँडरसन यांनी हा पराक्रम केला आहे.