पुणे – कॅन्टोन्मेंट परिसरातील लोकप्रिय बाजारपेठ असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटच्या विविध समस्यांकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. खोट्या अहवालाद्वारे एकतर्फी निर्णय घेतले जातात, असा आरोप करत फॅशन स्ट्रीट शॉपिंग सेंटर सार्वजनिक व्यापारी मंडळाने बोर्डाविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे.
याबाबत मंडळाचे अध्यक्ष भगत तौर म्हणाले, “बोर्डाने व्यावसायिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे लेखी आश्वासन 1997 मध्ये दिले होते. मात्र, आजपर्यंत त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. व्यावसायिक भरत असलेल्या कराची पावती बंद करून, खोटा अहवाल तयार करत बाजारपेठेबाबत एकतर्फी निर्णय घेतले जातात.
तसेच वारंवार निवेदन देऊनही त्यासंदर्भात सातत्याने दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच आम्ही शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली आहे.’ दि.6 नोव्हेंबर रोजी बोर्डाला बाजू मांडण्यासंदर्भात न्यायालयाने नोटीस बजावल्याचेही तौर यांनी सांगितले.