Fashion Designer Rohit Bal Passed Away | प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले आहे. मागील वर्षभरापासून हृदयाशी संबंधित समस्या असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
रोहित बल यांच्या निधनाची बातमी फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात FDCI ने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. रोहित यांच्या निधनाची बातमी कळताच कलाविश्वातून व फॅशन इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे. २०१० साली हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.
रोहित बल यांचा दिल्लीतील लॅक्मे इंडिया फॅशन वीक हा अखेरचा शो ठरला. या शोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे शो स्टॉपर होती. यावेळी अनन्याबरोबर ते रॅम्पवर वॉक करताना दिसले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोसाठी देखील रोहित बल यांनी पोशाख डिझाइन केले होते.
फॅशन इंडस्ट्रीत मोठे योगदान
रोहित बल यांचे फॅशन इंडस्ट्रीतील योगदान खूप मोठं आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांसाठी कपडे डिझाइन केले आहेत. रोहित यांचा जन्म ८ मे १९६१ साली श्रीनगरमध्ये झाला होता. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता.
त्यांना २००१ आणि २००४ मध्ये इंटरनॅशन फॅशन अवॉर्ड आणि २००६ मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘डिझायनर ऑफ द इयर’ म्हणूनही गौरविण्यात आले. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत.