शेतीपंपाना दिवाळीपासून सौरउर्जा?

दिवसा वीजपुरवठा : महावितरण प्रशासनाची तयारी

पुणे – शेतीपंपांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरण प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शेतीपंप ग्राहकांना सौर उर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रशासन आणि शेतीपंपाच्या ग्राहकांना निम्मा-निम्मा खर्च करावा लागणार आहे. दिवाळीपासून हा प्रकल्प सुरू होणार असून टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

राज्यभरात शेतीपंपाचे 23 लाख ग्राहक आहेत. मध्यंतरी वीजटंचाईचा सर्वाधिक फटका शेतीपंपांना सहन करावा लागला होता. त्यामुळे गावठाण आणि शेतीपंपाचे फीडर स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून शेतीपंपाना अवघा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. हा वीजपुरवठा रात्रीच्या सुमारास होत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्‍यात घालून शेतीला पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन त्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून यापुढील कालावधीत शेतीपंपांना सौर उर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनी दिली.

प्रशासनाचा तोटाही होणार कमी
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शेतीपंपाच्या ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे, सद्यस्थितीत या ग्राहकांकडे तब्बल 24 हजार कोटी रुपयांची थकबाकी अडकली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना आणि कल्याणकारी योजना आणण्यात आल्या होत्या. मात्र, त्यामध्ये अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे ही योजना कार्यान्वित झाल्यास प्रशासनाचा आर्थिक भार बहुतांशी प्रमाणात कमी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.