पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

ढेबेवाडी विभागात 95 टक्के पेरण्या पूर्ण

ढेबेवाडी -ढेबेवाडी विभागात 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. ढेबेवाडी भागातील सणबूर, काळगाव, वाल्मिक पठार या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली असून काही ठिकाणी पिके उगवून आली आहेत.

काही दिवसात पाऊस न पडल्यास उगवून आलेली पिके पावसाअभावी करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. जमिनीमध्ये ओल नसल्याने पेरणी केलेली बियाणे उगवून न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवण्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती उरकून घेत पेरणीची कामे केली. परंतु पुन्हा पाऊस न पडल्याने ढेबेवाडी विभागात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. मशागतीस आलेला खर्च, बी-बियाणे, लागवड आदी कामासाठी शेतीत घातलेला खर्च भागण्यापुरतेही उत्पन्न निघत नसल्याने आधीच तोट्यात असलेली शेती आणि त्यात दुबार पेरणीचे संकट यामुळे शेतकरी चिंतेच्या छायेखाली आहे
महाराष्ट्रात सात जूनला सुरू होणारा मान्सून यावर्षी लांबणीवर गेल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हवामान खात्याने मान्सून लांबणीवर जाण्याचा दिलेला अंदाज खरा ठरल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ढेबेवाडी विभागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात भात, मका, भुईमूग, ज्वारी, सुर्यफूल, सोयाबीन, उडीद इत्यादी पावसावर येणारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

शेतकऱ्यांनी या पिकांच्या पेरणीही मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. मात्र पाऊसच नसल्याने पिके वाया जाऊन नुकसान होणार आहे. याच दिवसात सर्व शाळा-महाविद्यालयांची नूतन शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत असल्याने तोही खर्चाचा बोझा शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असतो. त्यातच या दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.