बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत ! पिकांवरील रोगांमुळे वाढला औषध फवारणीचा खर्च

नाणे मावळ – सध्या अवकाळी पावसाचे संकट नसले तरी दिवसेंदिवस वाढत चाललेली थंडी, ढगाळ वातावरण व धुके पडणे अशा बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोग वाढले आहेत. त्यामुळे पिकांवर औषध फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून रब्बी हंगामातील पिके हाताशी आल्यवर अचानक अवकाळी पाऊस पडतो. खरीप हंगामाच्या अखेरीस पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काही शेतक–यांची हाताशी आलेली पिके वाया गेली. आता रब्बी हंगामात दोन आठवड्यांपासून मावळात रात्रीची कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. ही थंडी सर्वच रब्बी पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पीक चांगले येतील नेहमीपेक्षा उत्पादन वाढेल, अशी शेतकऱ्यांना आशा वाटत होती, परंतु थंडीबरोबर पहाटे धुके व दिवसा ढगाळ वातावरण, असा हवामानात बदल झाल्याने शेतकरी वर्गाच्या अडचणी वाढल्या आहेत. वातावरणातील या बदलाचा परिणाम गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, कांदा, भाजीपाला आदींसह सर्वच पिकांना हानिकारक ठरण्याचा धोका वाढला आहे.
काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्यास सुरुवात झाली आहे. गव्हाचे पाने पिवळे पडणे, हरभऱ्याचे फुले गळणे, ज्वारीचे पाने चिकट होणे, असे प्रकार वाढले आहेत. यातून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सतत कीटकनाशक औषधांची फवारणी करावी लागत आहे. परिणामी पिकांसाठीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.





