मोसमी पावसाच्या चालढकलीने शेतकरी चिंतेत

खरीप पिकाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता : चाऱ्याची समस्या गंभीर

– विशाल करंडे

लाखणगाव – आंबेगाव तालुक्‍यातील काही गावांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा चिंतेत असून बळीराजाला मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. अवकाळी पावसाने हुलकावणी दिली तर मौसमी पावसाने चालढकल केल्याने खरीप हंगामाचे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट होती. तसेच गतवर्षी पाऊसही कमी झाल्याने मागील एक महिन्यापासून नद्या आणि बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत.पाण्याअभावी शेती पिके जळू लागली आहेत. विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कुपनलिका पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत. विहिरी, पाझरतलाव, ओढे-नाले आणि नद्यांचे पाणी संपल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा हिरवा चाराही करपून गेला आहे. पाऊस वेळेवर होईल याबाबत शेतकऱ्यांना खात्री नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस पडल्यानंतर काही दिवसांनी विहिरींना किंवा कुपनलिकांना पाणी उपलब्ध होईल. तसेच जनावरांना खाण्यासाठी चारा उगवण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. तोपर्यत जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना दिव्य बनले आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर, आहुपे, माळीण, तळेघर इत्यादी आदिवासी डोंगरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने टॅंकर सुरू केले आहेत. भात पिकाची अवणी करण्यासाठी जमिनी भाजून तयार आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मान्सून पूर्व असणारा वळवाचा पाऊस होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भात पिकाच्या लावणीसाठी जोरदार पावसाची गरज असल्याचे आदिवासी शेतकऱ्यांनी सांगितले. घोडेगाव, मंचर आणि पूर्व भागातील पन्नास गावांतील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. जमिनी नांगरुन त्यामध्ये शेणखत टाकले आहे.

पावसाळी बाजरी, भुईमूग इत्यादी पिकांसह तरकारी पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे, परंतु सद्यस्थितीत पिण्यासाठी पाणी नाही तर शेती पिकांना कोठून येणार या विवंचनेत शेतकरी आहेत. तरकारी पिकांची रोपे लागवडीसाठी योग्य झाली असून पुरेसा पाऊस झाल्यानंतरच रोपांची लागवड केली जाणार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. सातगाव पठार भागात निसर्गावरच शेती अवलंबून आहे. तेथे सद्यस्थितीत पिण्यासाठी पाणी नसल्याने काही गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.

पावसाळी हंगामात येथे सुमारे नऊ हजार एकर क्षेत्रातील बटाटा लागवड केली जाते. बटाट्याचे वाण थोडेफार विक्रीसाठी आले असला तरी म्हणावा तसा उठाव नाही. पुरेसा पाऊस झाल्यानंतर बटाटा वाणाची विक्री होईल, अशी माहिती व्यापारी राम तोडकर आणि अशोक बाजारे यांनी दिली.

दुष्काळी असणाऱ्या लोणी-धामणी परिसरातील सहा गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. येथे पावसाची नितांत गरज आहे. वडगाव पीर, मांदळेवाडी इत्यादी गावांनी काही शेतकऱ्यांच्या डाळींब आणि आंब्याच्या बागा जळून गेल्या आहेत. तसेच जनावरांचा हिरवा चाराही करपून गेला आहे.
– योगेश आदक, शेतकरी

शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत
मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने काही पिकांना जीवदान मिळाले असले तरी हवामान खात्याने पाऊस लांबण्याची शक्‍यता वर्तवली आहे. मध्यंतरी झालेल्या अल्पशा पावसाने वातावरणात गारवा तयार झाला आहे, परंतु हा पाऊस पेरणीसाठी फायदेशीर नाही.पेरणीसाठी अजूनही मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे. तसेच या पावसाने ओढ्यांना पाणी आले नाही. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली नाही. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला नाही तर पाण्याचे दुभिक्ष्य असेच राहणार आहे.त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here