पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त 

शेवगाव – गेल्या चार-पाच वर्षांपासून परिसरावर पावसाने अवकृपा केल्याने ऐन पावसाळ्यात आज उन्हाळा भासत आहे. आजपर्यंत झालेल्या तुटपूंज्या पावसावर शेतकऱ्यांनी मोठया आशेनी केलेली पेरणी नंतरच्या पावसाअभावी वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पशुधन वाचविण्यासाठी बंद झालेल्या छावण्या पुनश्‍च सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.

सध्या 52 टॅंकर तालुक्‍यात 41 गावे व 203 वाड्यावस्त्यांची तहान भागवित आहे. सुरुवातीला शेवगाव, दहिगाव, भाविनिमगाव, गदेवाडी, चापडगाव, ठा.पिंपळगाव, बोधेगाव, जोहरापूर, खामगाव, हिंगणगाव, दहिफळ, खुंटेफळ, सुकळी, शेटके, गायकवाड जळगाव, मुरमी, बालमटाकळी बऱ्यापैकी पाऊस झाला होता.

एकूण 86 हजार 625 हेक्‍टर खरीप क्षेत्रापैकी 41 हजार 946 हेक्‍टरवर पेरणी झाली. यात बाजरी 5 हजार 484 हेक्‍टर, तुर 2 हजार 528 हेक्‍टर, मूग 229 हेक्‍टर, उडीद 30 हेक्‍टर, मटकी 95 हेक्‍टर, भुईमूग 209 हेक्‍टर, सोयाबीन 90 हेक्‍टर तर कापूस 33 हजार 252 हेक्‍टर पेरणी झाली आहे. मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने सर्वच ठिकाणी पिके पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी तालुक्‍यात एकुण 64 छावण्या सुरु झाल्या होत्या. शासनाच्या अटीची पूर्तता करण्यात छावणी चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आजपर्यंत 19 छावण्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने त्यांचे मे अखेर पर्यंतचे देणे एक कोटी 55 लाख रुपये अदा झालेले आहेत. उर्वरित छावण्यांच्या कागदपत्रांच्या तपासण्या (आँडीट) सध्या सुरु आहे.

तालुक्‍यात सध्या अद्याप 12 छावण्या सुरु आहेत. तर वरखेड, नजिक बाभुळगाव, ठाकुर पिंपळगाव, ढोरजळगाव ने, वाघोली, नांदुरविहीरे या सहा ठिकाणच्या छावण्यांना नुकतीच मंजुरी मिळून त्याही पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या 18 छावण्यात लहान 762 व मोठी 11 हजार 408 अशी 12 हजार 170 जनावरे आहेत. या व्यतिरीक्तही चापडगाव, बोधेगाव, सामनगाव अशा अनेक ठिकाणी छावण्या सुरु करण्याची मागण्या प्रलंबीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)