ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत

पिकांवर रोग, अळ्यांचा प्रादुर्भाव : दूषित हवामानाचा बसतोयं फटका

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्‍यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ हवामान तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

तालुक्‍यातील परिसरात गहू, हरभरा, ज्वारी पिकांवरोबरच विविध ठिकाणी तरकारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

या परिसरात कधी ऊन, कधी ढगाळ हवामान, तर थंडी आणि दाट धुके यामुळे ज्वारी पिकाला फटका बसला आहे. या परिसरात वारे वाहत असल्यामुळे येथील ज्वारी पीक भूईसपाट झाले आहे. त्यामुळे हुरड्यात आलेली ज्वारी जनावरांना घालण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे खरिप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर विविध अळ्यांनी आक्रमण केले आहे. सततचे दूषित हवामान शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ढगाळ हवामान, त्यातच दररोज सकाळी दाट धुके पडत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. या हवामानाचा सर्वच पिकांवर परिणाम होत आहे.

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याने गव्हावर तांबेरा, कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या प्रादुर्भावामुळे अळ्या, रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.

या बरोबरच वालवड, पापडी, घेवडा या पिकांना देखील या दुषित हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

उत्पादनात घट होणार
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान, धुके, वाऱ्याचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे कांदा, गहू, ज्वारी, बटाटा, हरभरा पिकावर या हवामानाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पिकांवर विविध प्रकारची औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहे. त्यामुळे यंदा उत्पादनातही मोठी घट होणार आहे. या एका मागून एक योणाऱ्या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मावळ तालुक्‍यात रब्बीचे साडेचार हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. सध्याच्या ढगाळ हवामान, सततच्या बदलामुळे आंबा, द्राक्षे, डाळिंब पिकांना अधिक धोका पोहोचतो. याशिवाय तालुक्‍यात हरभरा, गहू, ज्वारी ही पिके आहेत. ढगाळ वातावरण अधिक काळ राहिल्यास पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढेल. गहू पिकावर तांबोरा, ज्वारीवर चिकटा आणि हरभरा पिकावर घाटे आळीचा प्राद्रुर्भाव होत आहे. या पिकावर योग्य वेळी फवारणी केल्यास उत्पादन योग्य वेळी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होईल.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.