शेतकरी 26 मे यादिवशी पाळणार काळा दिन

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाला 26 मे यादिवशी सहा महिने पूर्ण होणार आहेत. त्याचे औचित्य साधून संबंधित दिवशी काळा दिन पाळण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केले. मागणी मान्य न झाल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने काळा दिन पाळण्याची घोषणा केली आहे.

त्यादिवशी देशातील जनतेने घरांवर, दुकानांवर आणि वाहनांवर काळे झेंडे फडकावण्याचे आवाहन मोर्चाकडून करण्यात आले आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पूर्ण होणार आहेत. काळा दिन पाळण्याचे तेही कारण असल्याचे मोर्चाकडून सांगण्यात आले. त्या दिवशी निषेधाचा भाग म्हणून मोदींच्या प्रतिमांचे दहन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारने खतांच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे शेती करणे अवघड बनले आहे, असे टीकास्त्रही मोर्चाकडून सोडण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.