बीड – महाराष्ट्र सरकारने एकानंतर एक यशस्वी योजना आणल्या आहेत. काँग्रेस म्हणत होती खटाखट खटाखट देणार, पण दिले कधीच नाही, ते काम महाराष्ट्र सरकारने करुन दाखवले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कौतूक केले.
तसेच नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांना जावे लागणार आहे. विकसीत भारतचे निर्माण विकसीत शेती शिवाय होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असेही चौहान म्हणाले.
परळी वैजनाथ येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल मंचावर उपस्थित होते. अजित पवार यांच्या उपस्थिततच चौहान यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली.
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राहुल गांधी आणि शरद पवार हे फक्त गप्पा करतात. शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा स्वामीनाथन आयोग, एमएसपीचा मुद्दा आला होता. तेव्हा त्यांनी नकार दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त बाता करतात, देत काहीच नाही, असे त्यांचे सरकार होते.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची योजना ही फक्त महाराष्ट्राची आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन. कारण ही योजना देशात कोणत्याच राज्यात नाही. धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागण्यांवर काम करण्याचे आश्वासन यावेळी चौहान यांनी दिले.
कांदा निर्यातबद्दलचा निर्णय घ्यावा – अजित पवार
कांदा निर्यात बंदी करणार नाही, असे एकदा सांगण्याची वेळ आली आहे. कारण आपण एवढे चांगले काम करुनही आपल्याला फटका बसतो. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री चौहान येथे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस येथे आहेत. आपण केंद्र सरकारला सांगितले पाहिजे की कांद्याबद्दलचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.