शेतकऱ्यांना घरपोच मिळणार ‘सातबारा’; महसूल विभागाचा उपक्रम

पुणे – महसूल व वनविभाग तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक भुमिअभिलेख यांचे निर्देशानुसार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना सातबाराचे मोफत घरपोच वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.

भोर तालुक्यात एकूण २०० महसुली गावे असून ८ महसुली मंडळांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत फक्त शेतीचे डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. सातबारा वितरीत करण्यात येणार आहे. सदर मोहीम कालावधीत गाव नमुना नं. सातबारा केवळ एकदा मोफत दिला जाईल.

भोर तालुक्यातील 42 हजार 206 व्यक्तिगत खातेदार, 9 हजार 756 संयुक्त खातेदार, 22 हजार 386 सामाईक खातेदार, 3 हजार 210 अभिव्यक्त कुटंब या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गाव नमुना नं. सातबारा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गाव नमुना सातबारा उताऱ्यात त्रुटी असेल तर तात्काळ त्याबाबतचा अभिप्राय नोंदवायचा आहे. त्याबरोबर गाव नमुना सातबारावर पिकांच्या अचूक नोंदीसाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी या अॅपचा वापर करावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आव्हान उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.