शेतकऱ्यांना यावर्षी 50 हजार कोटी अधिक मिळणार

मुंबई – यावर्षी अन्नधान्याचे 301 दशलक्ष टन एवढे विक्रमी उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने कृषी उत्पादनाच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. या किमतीच्या आधारावर शेतकऱ्यांना यावर्षी अतिरिक्त 50 हजार कोटी रुपये मिळतील, असे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.

केअर रेटिंग या संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, खरिपाचे उत्पादन 144 दशलक्ष टन होण्याची शक्‍यता आहे. त्यापेक्षा जास्त रब्बीचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे एकूण उत्पादन 301 दशलक्ष टनापर्यंत जाऊ शकते. केंद्र सरकारने खरीप पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये 4.7 टक्‍क्‍यांनी तर रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये 4.3 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. यावर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर तब्बल 3.8 टक्के राहणार आहे.

ग्रामीण भागातून खरेदी वाढणार 

सरकारने एमएसपीनुसार कृषी उत्पादनांचे दर देण्याची यंत्रणा विकसित करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अधिक 50 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे खेड्यातून दुचाकी, ट्रॅक्‍टर, तीन चाकी वाहने अधिक प्रमाणात विकली जाणार आहेत. त्या दृष्टिकोनातून अनेक कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर उत्सवाच्या काळातही ग्रामीण भागातून खरेदीत जास्त होण्याची शक्‍यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
……….

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.