शेतकऱ्यांना अनोखी भेट : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची माहिती
मावळ – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्च अधिकार समितीच्या (हाय पॉवर कमिटी) बैठकीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मावळ तालुक्यातील तळेगाव (निगडे) एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 मधील 5500 एकर पेक्षा अधिक जमिनीच्या 32 (1) च्या प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जमिनीचा मोबदला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनोखी भेट मिळाली आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
मुंबई (मंत्रालय) येथे मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्र. 4 मध्ये निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, मंगरूळ, कल्हाट, पवळेवाडी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीची यापूर्वी 32 (2) प्रमाणे त्या ठिकाणी सरकारी मोजणी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. 32 (1) च्या अंतिम मान्यतेसाठी एमआयडीसीकडे सादर करण्यात आली होती; परंतु गेले अनेक महिने शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने निवेदने देऊन या संबधी पाठपुरावा सुरू होता.
दरम्यानच्या काळात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसभापती शांताराम कदम, भिकाजी भागवत, कृष्णा भांगरे, ऍड. सोमनाथ पवळे, गणेश कल्हाटकर, मारुती हांडे, रामदास चव्हाण, मोहन घोलप, शिवाजी करवंदे, बबनराव आगिवले, बबुशा भांगरे, संतोष जाचक, नथू थरकुडे, गणेश भांगरे, गोपाळ पवळे, हरिभाऊ पवळे, बुधाजी जगेश्वर, बंडू कदम, विठ्ठल कदम, तानाजी करवंदे, मंगेश शेलार, संदेश शेलार यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रधान सचिव यांना 32 (1) ची प्रक्रिया झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आंदोलनाच्या दिवशी “व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचेशी चर्चा केली. सहसचिव सुधाकर त्याचबरोबर विभागीय अधिकारी अविनाश हदगल, प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्याबरोबर चर्चा झाली.
या विषयाबाबत उद्योगमंत्री देसाई यांची बैठक झाली व त्यांनी मा.प्रधान सचिवांना निर्देश देवून 32 (1) च्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मावळच्या शेतकऱ्यांच्या वतीने बाळा भेगडे यांनी ऋण व्यक्त केले.
…म्हणून 32 (1) प्रक्रियेला वेग
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्र. 4 मध्ये निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, मंगरूळ, कल्हाट, पवळेवाडी या भागातील 5500 एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील 32 (1) ची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यानुसार शासनाने 32 (1) च्या प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता “एमआयडीसी’तील शेतकऱ्यांची जमीन शासनाच्या मालकीची झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जनरल मोटर्स : कामगार हिताचा निर्णय घ्यावा
तळेगाव एमआयडीसी येथील ऑटोमोबाइल क्षेत्रातील जनरल मोटर्स ही मल्टिनॅशनल कंपनी चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स कंपनीला विकण्यात आली आहे. परंतु कंपनीत काम करणाऱ्या 3 हजार 578 कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सर्व बाब लक्षात आणून दिली. जनरल मोटर्स कंपनीमधील कामगारांना ग्रेट वॉल मोटर्स कंपनीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी केली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने याबाबतचा कामगारांच्या हिताचा ठोस निर्णय रलवकरत लवकर न घेतल्यास सर्व कामगारांसोबत आंदोलन करू, असा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.