शासकीय नियमावलीत शेतकऱ्यांचा ‘बळी’

जाचक अटी लादल्यामुळे बाधित शेतकरी मदतीपासून राहणार कोसो दूर

शिक्रापूर – महाराष्ट्रातील शेतकरी यापूर्वी पाऊस नसल्यामुळे कोरड्या दुष्काळाने मेटाकुटीला आला होता. आता मुबलक पाऊस झाल्याने बळीराजा काही प्रमाणात आनंदित असताना अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजा ओल्या दुष्काळात बुडाला आहे. सध्या बळीराजा शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट पसरलेले असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न यांसह आदी सोयीसुविधा उपलब्ध कशा करायच्या, चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. यापूर्वी पाऊस नसल्यामुळे शेतकरी दुष्काळामध्ये अडकला होता. परंतु आता पाऊस असून शेतकरी दुष्काळाच्या खाडीत सापडला आहे. शासनाकडून पंचनामे सुरू केले असताना त्यामध्ये कित्येक नियम व अटी लादल्या आहेत. त्यामुळे नियम व अटी काय कामाच्या, संताप शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागील मरणकळा अजूनही हटता हटेना

सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडीमध्ये सर्व राजकीय पक्ष दिवसभरात वेगवेगळे निर्णय देऊन बोलत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वपक्षीय पक्ष नेटाने बोलत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना शेतकऱ्यांची काळजी आहे की नाही, हा विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी हे शासनाची काही तरी मदत मिळेल, या आशेने दररोज सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून पिकांचे पंचनामे करून घेत आहेत. मात्र, पंचनामे होऊन त्यामध्ये काही नियम व अटी लावण्यात येत असल्यामुळे पंचनामा होऊन देखील आम्हाला काही मदत मिळेल की नाही, अशी चिंता शेतकरी करीत आहेत.

सुका गेला आता ओल्या दुष्काळाची चिंता भेडसावली

एकीकडे शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना जादा मदत मिळणे गरजेचे असताना शासन तुटपुंजी मदत देत आहेत. त्या मदतीतून शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज फिटणार नाही. कोणत्याही प्रकारचे काम होणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. परंतु तरी सुद्धा शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

सरसकट वीजबिल व कर्जमाफीची गरज

महाराष्ट्रामध्ये शेतकरी दुष्काळात बुडालेला असताना कोणत्याही प्रकारचे पिक घेऊ शकत नाही. एकीकडे शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीतील मशागत, पेरणी व लागवड केलेली असताना आता सर्व काही मातीमोल झालेले आहे. यापुढील काळात कर्ज फेडू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरसकट वीजबिल माफ व संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाण्यात पिके कुजताना पाहण्याची वेळ

शेतकरी हे यापूर्वी पाणी नसल्यामुळे कोरड्या ठणठणीत जमिनीत पिके जाताना पाहत होते तर काही शेतकरी लांबून पाणी आणून पिके जागविण्यासाठी धडपडत होते. परंतु आता पाणी असताना देखील पाण्यात पिके कुजून जात असताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.