बटाटा चोरीमुळे शेतकरी हैराण

पेठ: सातगाव पठार तालुका आंबेगाव भागात बटाट्याचे बाजारभाव अधिकाधिक प्रमाणात वाढत असल्याने शेतकऱ्यांचे बटाटे रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याच्या घटनात वाढ होताना दिसून येत आहे. चोरट्यांनी रानावनात आडबाजुला असलेल्या बटाटा आरणीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

साधारणत तीन ते चार दिवसापूर्वी पेठ येथील बुट्टे वस्तीतील राम सिताराम बुट्टे या शेतकऱ्याच्या बटाटा अरणीतील 30 ते 35 पिशव्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला. अश्याच प्रकारे बबन बाजीराव गुजाळ या तरुण शेतकऱ्यांच्या सौरग्या रोडवरील शेतातून अंदाजे तीस पिशव्या बटाटा चोरून नेला .चोरीला गेलेल्या बटाट्याची किंमत अंदाजे 60 हजार रुपये असल्याची माहिती शेतकरी बबन गुजाळ यानी दिली. सध्या प्रति 10 किलोस 320 ते 340 असा बाजार भाव मिळत आहे.

सातगाव पठार भागात बटाट्याला कधी नव्हे इतका विक्रमी बाजारभाव वाढला आहे. बबन गुजाळ आणि कुटुंबातील इतर सदस्य हे आपले हक्काचे उदरनिर्वाहाचे पीक चोरीला गेले हे पाहून ढसा ढसा रडु लागले. कष्ट करून जपून ठेवलेले बटाटा पीक असे अचानक चोरीला गेल्याचे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. अरणीतील बटाटे रात्रीच्या वेळी चोरीला जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.