मळदमधील शेतकऱ्याचा उसासाठी अनोखा प्रयोग

पारंपरिक पद्धतीत उसाचे वजन घटते

पारंपरिक पध्दतीने ऊस लागवड केल्यास एकरी 10 ते 15 हजार डोळे असतात. ऊस बांधणीला येईपर्यंत दीड लाख ते पावणेदोन लाख ऊस रोपांची संख्या असते, त्यामुळे जमिनीत टाकलेली सर्व खते, अन्नद्रव्ये ही रोपे शोषून घेतात आणि कालांतराने त्या फुटव्यांचे उसात रूपांतर न होता ती जागीच विरून गेल्याने तुटण्यायोग्य उसांची संख्या एकरी तीस हजार राहते. परिणामी वजनात घट होऊन उत्पादनात घट होते. उसाचे तोडणीयोग्य फुटवे एकरी चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार असतील तर उत्पादन जास्त निघते.

रावणगांव – मळद (ता. दौंड) येथे प्रगतीशील शेतकरी शांतीकुमार शहा (सराफ) यांचे 100 एकर जयश्री गार्डन हे बागायती क्षेत्र असून, तेथे ऊस, कांदा, गहू, ज्वारी, आंबा, सीताफळ, लिंबोणी अशी विविध प्रकारची पिके घेतली जातात. शेतात विविध प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न आदर्श ठरला आहे.

ऊस पिकाला सर्वात जास्त पाण्याची आवश्‍यकता असते. उन्हाळ्यातील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन शांतीकुमार शहा (सराफ) यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी या वर्षी उसाच्या दोन ओळींमधील अंतर 8 फूट ठेवून लागवड केली. यामुळे दोन ओळींमध्ये अंतर राहून, भरपूर हवा व सूर्यप्रकाश पिकाला मिळतो आणि पिकाची झपाट्याने वाढ होते, तसेच उत्पादनात वाढ होते आहे. याबरोबरच मजुरांचा तुटवडा असल्यामुळे ट्रॅक्‍टर किंवा बैलाच्या साह्याने आंतरमशागत सोपी जाते असून खर्चही कमी होतो आहे.

याबाबत जयश्री गार्डन चे कृषी व्यवस्थापक पोपटराव लांडगे यांनी सांगितले की, 1 सप्टेंबर 2019 रोजी 86 हजार 32 या उसाच्या वाणाची लागवड 6 एकर क्षेत्रावर एक डोळा पध्दतीने प्रथमच आठ फुट पट्टा पध्दत वापरून केली. या पट्ट्यामध्ये दोन सऱ्यांमध्ये हिरवळीचे खत धैंचाची लागवड केली आहे, ज्यामुळे तण वाढत नाही व धैंचा पूर्ण वाढल्यानंतर ते जमिनीत गाडून याचे खत उसाला मिळते.

ऊस लागवड करताना सुरुवातीला ह्यूमिक ऍसिड, क्‍लोरो, बाविस्टीन या द्रावणांच्या मिश्रणामध्ये उसाचे एक डोळा बेणे बुडवून बेणे प्रक्रिया केली व नंतर लागवड करण्यात आली. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी प्रति एकर एक बॅग युरीया खताची मात्रा देण्यात आली. त्यानंतर वीस दिवसांनी सायरस व ओलेक्‍स या किटकनाशकांची अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी केली. आतापर्यंत प्रति एकर 10 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.