नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) देशभरात ट्रॅक्टर मोर्चे काढण्याची घोषणाही केली. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल 48 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे.
त्याविषयी चिंता व्यक्त करत एसकेएमने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चे काढण्याचे आवाहन केले. ट्रॅक्टरसह इतर वाहने, दुचाकी घेऊन प्रजासत्ताक दिनी संचलन करण्याची सूचना शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी अनेक महिन्यांपासून सीमेवर आंदोलन करत आहेत.
त्या आंदोलनाचे नेतृत्व डल्लेवाल यांची एसकेएम(बिगर राजकीय) आणि इतर काही संघटना करत आहेत. त्या आंदोलनाला बळ देण्यासाठी एसकेएमही पुढे येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील महत्वाची बैठक उद्या (सोमवार) होईल. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. त्या आंदोलनाचे नेतृत्व एसकेएमने केले होते.