ढगाळ वातावरणारे शेतकऱ्याची उडाली झोप

लहरीहवामानामुळे भाटघर परिसरातील बळीराजा हैराण

भाटघर- भाटघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण आहे. तर हवामान खात्याने पावसाची शक्‍यताही वर्तवली आहे. दरम्यान, परिसरात भातकाढणी संपली असून भातभेळ्याची गंज शेतकऱ्यांनी शेतात रचली आहे; परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस झाल्यास गंज भिजण्याची शक्‍यता आहे, यामुळे जनावरांसाठी चारा कमी पडणार असल्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

यावर्षी पाऊस जोरदार झाल्याने भाटघर परिसरात भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी भात उत्पादन झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी पावसाचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांसह इतर नागरिकही हैराण झाला आहे. यावर्षी वर्षभर पावसाचे वातावरण राहते की काय? अशी चर्चा सध्या झडत आहे. पुढील काळात पावसाचे वातावरण राहिल्यास याचा परिणाम कांदा, ज्वारी, हरभरा या पिकांवर होणार आहे.

भाटघर परिसरात कंपन्यांचा अभाव असल्याने रोजंदारीसाठी पुणे, शिरवळ याठिकाणी तरुणांना धाव घ्यावी लागत आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने हवेमध्ये थंडीचे प्रमाण आढळून येते. यामुळे दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांना थंडीचा सामना करावा लागत आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन सर्दी-खोकला घशाचे आजार वाढीस लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.