कृषीमंत्र्यांची बहिण आझाद मैदानात उपोषणाला

शिक्षकांच्या उपोषणावरून विरोधक आक्रमक

मुंबई: 2005 पूर्वी नोकरीला लागलेल्यांना नियमानुसार पेन्शन मिळावी या मागणीसाठी आझाद मैदानात शिक्षकांनी पुकारलेल्या उपोषणाचे पडसाद विधानसभेत उमटले. राज्याच्या कृषीमंत्र्यांची सख्खी बहिणच या आंदोलनात सहभागी झाल्या असताना लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या या शिक्षकांना पोलिसांनी हुसकावून लावल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपण स्वत: उपोषणकर्त्या शिक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगताच विरोधक शांत झाले.

2005 पूर्वी विनाअनुदानित तत्वावर लागलेल्या व नंतर अनुदान मिळालेल्या शाळांमधील हे शिक्षक असून 2005 पूर्वी आपण नोकरीला लागल्याने आपल्याला नियमानुसार पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे विरेंद्र जगताप यांनी आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेल्या शिक्षकांचा विषय उपस्थित केला.

10 ते 6 या वेळेतच तेथे आंदोलनाला बसता येईल, हा नियम दाखवून पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना तेथून हुसकावून लावले. इतकेच नव्हे तर आंदोलकांचे नेतृत्व कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे करत असल्याचे जगताप यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

लोकशाही मार्गाने उपोषण करत असलेल्या आंदोलकांना तेथून हटविण्याचा काय अधिकार? मंत्र्यांच्या बहिणीलाच पोलीस अशी दडपशाही कशी करू शकतात? असे सवाल करताना विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. त्याचवेळी विरोधी सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळया जागेत आले.

शिक्षकांच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक होणार असल्याचे दिसताच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हस्तक्षेप केला. कायम विनाअनुदानित मधील कायम शब्द मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हाच वगळायला लावला होता. या शिक्षकांच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. मी स्वतः आझाद मैदान येथे जाउन त्या शिक्षकांची भेट घेईन व प्रश्न सोडविन, असे आश्वासन कदम यांनी दिल्याने वातावरण निवळले.

Leave A Reply

Your email address will not be published.