कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

संजीवराजे नाईक-निंबाळकर : वाई पंचायत समितीमध्ये खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी आढावा बैठकीचे आयोजन
शेतकऱ्यांना कसलीच कमतरता जाणवू देणार नाही : पं. स. कृषी विभाग

वाई – खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, यांनी वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाने 2019 चा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा वगळता कोणत्याही विभागात पावसाचे आगमन झालेले नाही, मराठवाड्यात गारांसह मुसळधार पाऊस पडल्याने बागायती पिकांचे नुकसानच झाले आहे.

सातारा जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला खरीप हंगामाची चाहूल लागली आहे, प्रत्येक तालुकानिहाय खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले असून वाईच्या पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाई पंचायत समितीच्या तालुका कृषी विभागाने समन्वय आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निबांळकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती- मनोज पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, कृषी विकास अधिकारी विनायक पवार व उपविभागिय कृषी अधिकारी जे. जी. कवडे तसेच तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पंचायत समितीच्या सभापती रजनीताई भोसले, उपसभापती अनिल जगताप, जिल्हा परिषद सदस्य संगीता मस्कर, शारदाताई ननावरे, पंचायत समिती सदस्य पै. विक्रांत डोंगरे, दीपक ननावरे, सहा. गटविकास अधिकारी श्रीमती उज्वला चिखलीकर, तालुक्‍यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, तलाठी, ग्रामसेवक, सोसायट्यांचे सचिव, सहकारी बॅंकांचे संचालक व अधिकारी, कृषी निविष्ठा केंद्रांचे प्रतिनिधी, शेतकरी व लाभार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, कृषी विभागाच्या माध्यमातून लाभार्थींना 50 टक्के अनुदान देण्यात येणार असून खते, व बी-बियाणे खरेदीसाठी त्याचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावा, तसेच वाई तालुक्‍यात उसाबरोबर भातशेतीसुध्दा मोठ्या प्रमाणात केली त्यासाठी भाताचे उत्तम प्रतीचे बियाणे, व इतरही मुग, चवळी, भुईमूग, ज्वारी, उडीद, मका या पिकांची बियाणे चांगल्या प्रतीची कृषी विभागाकडे मिळणार असून त्याचा लाभ तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी घ्यावा व त्यासाठी कृषी विभागाने योग्य समन्वय राखण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले, यावर्षी गतवर्षा पेक्षा दुप्पट अनुदानात वाढ करण्यात आली आहे. एक कोटीचे अनुदान तीन कोटी करण्यात आले आहे. यावेळी शेतीमध्ये तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या कृषी विभागच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर व वाई तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चचंद्र धुमाळ, यांनी आपल्या प्रास्ताविकात कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती यांचा सविस्तर आढावा घेतला व तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी निसर्गाची साथ लाभल्यास या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच यावर्षी पावसाचे प्रमाण 95 टक्के असले तरीही आगमन मात्र उशिरा होणार आहे, त्यानुसार तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नियोजन करावे असेही आवाहन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.