Farmers Protest: शेतकऱ्यांच्या 101 गटांनी शुक्रवारी पंजाब आणि हरियाणा सीमेवरील शंभू सीमेवरून दिल्लीच्या दिशेने पायी कूच सुरू केली. परंतु काही मीटरवर बॅरिकेड्स लावून त्यांना थांबवण्यात आले. हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे न जाण्यास सांगितले. यावेळी शंभू सीमेवर गदारोळ झाला. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले, तर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
शेतकरी आंदोलनात आतापर्यंत काय काय झाले ?
1. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ची कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी शेतकरी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी मोर्चा काढत आहेत. विविध शेतकरी संघटनांचे झेंडे हातात धरून काही शेतकऱ्यांनी घग्गर नदीवर बांधलेल्या पुलावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लावलेली लोखंडी जाळी खाली पाडली.
2. भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचा हवाला देत हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे न जाण्यास सांगितले. हरियाणाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. उपायुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत पायी, वाहन किंवा अन्य मार्गाने कोणत्याही प्रकारची पदयात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
3. दरम्यान, अंबाला प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा शुक्रवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
4. हरियाणाने 9 डिसेंबरपर्यंत अंबालामधील 11 गावांमध्ये मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद केली. शुक्रवारी दुपारी अंबाला येथील डांगडेहरी, लोहगढ, मानकपूर, दादियाना, बारी घेल, लार्स, कालू माजरा, देवी नगर, सदोपूर, सुलतानपूर आणि काकरू गावात संचारबंदी लागू करण्यात आली. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुमिता मिश्रा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या सेवा 9 डिसेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत बंद राहतील.
5. शंभू सीमेवर शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर म्हणाले की, पोलीस आम्हाला दिल्लीला जाऊ देत नाहीत. शेतकरी नेते जखमी झाले आहेत, पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेऊ.
6. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शंभू बॉर्डर, दिल्ली-चंदीगड हायवेवरील सिंघू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शंभू सीमेवर सुरक्षेचे अनेक स्तर आधीच तैनात आहेत. सात थरांच्या सुरक्षेनंतर प्रशासनाने शंभू सीमेवर आणखी तीन थरांची सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे.
7. एमएसपी व्यतिरिक्त, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन आणि वीज दरात वाढ करू नये, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 2021 च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा, 2013 मध्ये भूसंपादन कायदा पुनर्संचयित करावा आणि 2020-21 मध्ये मागील आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशीही त्यांची मागणी आहे.
8.अंबालाच्या शंभू सीमेजवळ, जिंदच्या खनौरी आणि सोनीपतच्या सिंघूजवळ पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शंभू-खनौरी सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा सरकारने दोन्ही बाजूंना निमलष्करी दलाच्या 29 कंपन्या तैनात केल्या असून सीमा सील करण्यात आल्या आहेत.
9. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी आपला पाठिंबा दर्शविला आणि सांगितले की, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी दरवाजे खुले आहेत.
10.राज्यसभेत, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आश्वासन दिले की सरकार सर्व शेतीमाल एमएसपीवर खरेदी करेल. ही मोदी सरकारची हमी असल्याचे ते म्हणाले.