मुंबईत ‘लाल वादळ’! मोर्चामध्ये ट्रॅक्‍टर, जीपसह हजारो शेतकरी सहभागी

मुंबई – केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा आसूड आता महाराष्ट्रातही कडाडल्याचे पाहायला मिळत आहे. हा मोर्चा 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लॉंग मार्च नाशिकवरून सुरू झाला. काल संध्याकाळी अखिल भारतीय किसान सभेचा हा लॉंग मार्च सुरू झाला. एकूण 21 जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. सर्व जण पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. घोषणा देत, गाणी म्हणत, ढोल वाजवत आणि हातात लाल बावटा घेऊन शेतकऱ्यांचा हा जत्था कसारा घाटापर्यंत आला आहे.

इगतपुरीतील घाटंदरी येथे या शेतकऱ्यांनी काल रात्री मुक्काम केला. त्यानंतर पुन्हा पहाटे नव्या उमेदीने सर्व शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच केली. नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा मोर्चा आज दुपारी मुंबईतील आझाद मैदानात येऊन पोहचला आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्‍यातून मुंबईत दाखल झाले आहे.

या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी झाल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्‍वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकडे देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने कूच करणार आहे.

कोट
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी आमचा मोर्चा आहे. त्याशिवाय राज्य सरकारकडे आमच्या काही मागण्या आहेत. महाराष्ट्र सरकारने करोना काळात महात्मा फुले कर्ज माफी योजना स्थगित केली होती. ही योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदानात धरणे धरणार आहोत.
– अजित नवले

चौकट
शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसनं पाठिंबा दिला आहे. इतकच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्‍चरला लावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.